(आजची भारतीय तरुणाई कुठे चालली आहे? केवळ वासनेपोटी आई-मुलगा नात्याचा विसर पडावा? हया घाणेरडी मानसिकतेबद्दल डोळ्यात अंजन घालणारा लेख ) |
काही दिवसांपूर्वी मानवी समाजाला लाजवेल अशी धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली. २२ वर्षीय मुलाने आपल्या ४६ वर्षीय आईवर बलात्कार केला. या मुलाला पॉर्न पाहण्याचे व्यसन होते. कामावरुन घरी आल्यावर तो नेहमी मोबाईलवर पॉर्न पाहायचा. एके दिवशी अंधाराचा फायदा घेत त्याने आपल्याच आईवर बलात्कार केला. २०१४ मध्ये नालासोपारा येथे अशीच घटना घडली होती. २१ वर्षीय मुलाने आपल्या विधवा आईवर बलात्कार केला होता. मुलाला अंमली पदार्थांचं व्यसन होतं. आता फेब्रुवारीमध्ये सुद्धा विरारमध्ये एका २५ वर्षीय मुलाने आपल्या सावत्र आईला बेदम मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला, आई व मुलाच्या ईश्वरीय नात्याचा खून केला.
मानवाने ज्यावेळेस कुटुंब संस्था पत्करली किंवा निर्माण केली तेव्हा कालांतराने आई आणि मुल या नात्याला विशेष महत्व प्राप्त झालं. जी आपल्याला जन्म देते ती जननी ही ईश्वरासमान आहे. नव्हे नव्हे तर ती ईश्वरापेक्षाही ज्येष्ठ आहे, असं मानण्याची भारतात परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत आईला प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्त्री ही किती मादक असते यावर भर देण्यात आला आहे. पण भारतात "स्त्री ही अनंत काळाची माता असते" असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीने स्त्रीचा शृंगार स्वीकारलेला आहेच. पण आपल्या समाजाने स्त्रीच्या मातृत्वाच्या रुपावर अधिक भर दिला आहे. परमेश्वराला सुद्धा अवतार घेण्यासाठी आईची गरज लागते, असं म्हटलं जातं. स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी... श्रीराम व श्रीकृष्ण या इतिहास पुरुषांना हिंदु जगतात अवतार मानलं गेलं आहे. त्यांचं मातृप्रेम सर्वश्रृत आहे. कृष्ण आणि यशोदा मातेचं नातं किती उदात्त... दोघांचं रक्ताचं नातं नसतानाही त्यांच्या प्रेमभावाच्या कथा ऐकून आपण भावूक होतो. श्रावण बाळ आणि भक्त पुंडलिक हे आदर्श मुलाचे प्रतिक आहेत. आपल्या भारत देशाला उत्तम, उदात्त व उन्नत परंपरा लाभली आहे. चालताना थकून रस्त्याच्या कडेला स्त्रीया झाडाखाली निजलेल्या असताना त्यांना स्पर्श करण्याची हिंमत वार्याला सुद्धा होत नसे, अशी उदाहरणं आपल्या ग्रंथात सापडतात. पण आजच्या भारताची स्थिती पाहिली तर चित्र अगदिच उलटे आहे.
हे असे का झाले? याचे उत्तर आधुनिक विचारप्रणालित आहे का? आई, बहिण, पत्नी, मुलगी या सगळ्या जरी स्त्रीया असल्या तरी त्यांचा अधिकार वेगळा आहे. त्यांच्या सोबत वागण्याची पद्धत वेगळी आहे. लहानपणी आईचे दूध पिताना, बहिणीसोबत बागडताना, पत्नीसोबत संभोग करताना आणि मुलीचे लाड करताना, वेगवेगळ्या कारणांमुळे पुरुषाचा स्त्रीच्या शरीराशी संबंध येतो. परंतु त्यामागची भावना वेग-वेगळी आहे व उदात्त आहे. आपले पूर्वज कसे राहत होते हे आपण शालेय पाठ्यपुस्तकात शिकतो. समूह जीवनाची रुची निर्माण झाल्यावर कुटुंब व्यवस्था कशी प्रगत होत गेली याचे धडे आपण सर्वांनी गिरवले आहे. पशूंमध्ये कोणतेही नाते पाळले जात नाही. पण मानवाने स्वतःची अशी एक सामाजिक रचना निर्माण केलेली आहे आणि ही रचना जगातील बहुसंख्य देश पाळतात. काही सामाजिक बंधनं आहेत. ती पाळावी लागतात. मुलगी वयात आल्यावर वडिलांनी तिच्याशी वेगळ्या प्रकारे वागायचं असतं, शिस्तीत वागायचं असतं, अशी काही सामाजिक बंधनं आहेत. वयात आलेल्या मुलीशी आइ सुद्धा जरा जपून वागायची. सावरकरांनी लिहिलेल्या काळे पाणी या कादंबरीत आई व मुलीचे नाते पूर्वी कसे असायचे हे दिसून येतं. या कादंबरीतील काही ओळी इथे देतो. "तिच्या एकुलत्या एक मुलीचे लडिवाळ शब्द ऐकताच रमाबाईंच्या वात्सल्याचे इतके भरते आले की, एखाद्दा पित्या लेकरासारखे तिच्या लेकराचे मुके घेण्यासाठी रमाबाईंचे ओठ फुरफुरले. पण आईचे प्रेम जितके उत्कट असते तितकेच वयात येऊ लागलेल्या मुलीशी वागताना ते संकोची असते. मालतीच्या गालाला अगदी लागत आलेले आपले तोंड मागे घेऊन तिच्या आईने त्या वयात येऊ लागलेल्या लेकीच्या वदनाला दोन्ही हातात क्षणभर दाबून धरले आणि हळूच मागे सारीत मालतीला आश्वासिले." या प्रसंगावरुन आपल्या पूर्वीची रित लक्षात येते. आपण भारतात राहतो. भारताला घटना प्राप्त झाली आहे, कायदे आहेत. ते कायदे पाळावे लागतात, नाही पाळले तर शिक्षा होते. तसेच सामाजिक जीवनात काही बंधनं आहेत. ती बंधनं पाळावी लागतात. नाहीतर माणसाला अतिरिक्त स्वातंत्र्याची चटक लागते आणि एखाद्या गोष्टीची चटक लागली तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. म्हणून कायद्यांचि गरज पडली आहे. सज्जन माणसाला कधीच कायद्याची गरज नसते. कारण तो चांगलाच वागत असतो. पण दुर्जन माणसाला मात्र कायद्याची गरज असते.
आपल्या भारतामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. हा तरुणांचा देश आहे. पण आपल्या भारतातील काही तरुण विकृतीकडे वळत आहेत. ऑक्टोबर २०१४ मधील वडोदरामधील घटना आहे. १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली. एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी या मुलीने आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे आई वडिलांची हत्या केल्यानंतर तिने प्रियकरासोबत शारीरीक संबंध प्रस्तापित केले. किती हि विकृती? आईवर बलात्कार ही घटना विकृतीला लाजवेल इतकी घृणास्पद आहे. भारतातील तरुण इतके विकृत का होत आहेत. या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले पाहिजे व यावर तोडगा काढला पाहिजे. कुठेतरी लोकमान्य टिळकांचे एक वाक्य वाचले होते, "धर्मामुळे नव्हे तर धर्म अजिबात नाकारल्यामुळे आपली अधोगती झाली आहे". या विकृतीमागचे हे तर कारण नसावे ना? कारण काही असो, ते शोधून त्यावर उपाय झाला पाहिजे. सरकारनेही पुढाकार घ्यावा.. यासाठी काही कार्यक्रम राबवले पाहिजेत. एक लेखक म्हणून अशा घटना वाचल्या की मला फार अस्वस्थ व्हायला होते. आपली मर्यादा लेखनापर्यंतच मर्यादित आहे, हे कळल्यामुळे दुःखही होतं. परंतु दुसर्याच क्षणी आठवतं की समाजावर लेखनाचा परिणाम होत असतो. म्हणून सकारात्मक लेखणी चालवण्याचा आनंदही होतो. सांगायचे तात्पर्य अधिकाधित साहित्यिकांनी या विषयावर प्रबोधन केले पाहिजे. या विषयावर चिंतन करण्याची हिच योग्य वेळ आहे. आपण सर्वांनी मिळून यावर विचार करुन कृती करण्याची गरज आहे. नाहीतर विनाश अटळ आहे.
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
शिवी जगणारी डुकरं पण असतातच की समाजात......
ReplyDelete