अखेर पुरावा सापडलाच....!


(सकाळ या वृत्तपत्राने घेतलेली दखल)



    अखेर शिव-समर्थ संबंधांचा "अस्सल" पुरावा प्रकाशित !
 आनंदी-आनंदवनभुवनीं !!
 गेल्या अनेक दशकांत मूळ सनदेच्या अभावी संशयास्पद ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या चाफळ देवस्थानाच्या व्यवस्थेसंबंधीच्या सनदेचा शोध लागला असून दि. २३ डिसेंबर २०१७ रोजी पुण्याच्या सुप्रसिद्ध ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या पाक्षिक सभेत इतिहास आम्ही (शिवराम आणि मी) या सनदेचे वाचन आणि नव्याने सापडलेल्या मूळ पत्राचे चित्र प्रकाशित केले.
      मे २०१७ साली लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररीत’ या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक श्री. संकेत कुलकर्णी यांना सापडली असून महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे दिले आहेत त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण अकरा मोर्तबा असून एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर असून उरलेल्या दहा मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे. संकेतरावांचे हे ऋण कधीही न उतरणारे आहेत. गेल्या सहा महिन्यात या सनदेतील माहिती ताडून बघून मगच हे पत्रं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आमच्या इतिहासाच्या पाऊलखुणाच्या टीमने जो पाठिंबा दिला तो काय वर्णावा?
आजवर इ.स. १९०६ पासून म्हणजे जवळपास १११ वर्षे या मूळ सनदेचे चित्र संशोधकांना उपलब्ध झाले नसल्याने देवांनी केलेल्या लिप्यांतरावरुनच या पत्राचे खरे-खोटेपणा ठरवले जात होते. पण मूळ पत्रं उपलब्ध झाल्याने सगळे संशय दूर झाले असून यापुढे या वादावर पडदा पडेल अशी आशा आहे. लवकरच या पत्राचे छायाचित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोर्तबासह लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात करण्यात येईल. कालच्या पाक्षिक सभेला परवानगी दिल्याबद्दल भारत इतिहास संशोधक मंडळाच्या श्री. पांडुरंग बलकवडे, डॉ. सचिन जोशी, आणि श्री. मंदार लवाटे, तसेच सर्व विश्वस्तांचे मनःपूर्वक आभार.
आज सकाळी गुरुवर्य श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ही आनंदाची बातमी देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. काल दुसऱ्या एका कार्यक्रमामुळे त्यांना पाक्षिक सभेला उपस्थित राहता आले नाही, पण पाक्षिक सभेत हे मांडलं आहे हे ऐकून श्रीमंतांनाही आनंद झाला. खरंतर सनद सापडल्यानंतर प्रथम त्यांना ती दाखवून मगच पुढचे संशोधन सुरु होते. अजून काय लिहू? गेल्या चार-पाच वर्षांपासून हे एक स्वप्न मनीं बाळगलेलं, की या सनदेचं मूळ पत्रं मोर्तबासह उपलब्ध व्हावं; आणि आज ते पूर्ण झालं. प्रत्यक्ष समर्थांच्याच शब्दात सांगायचं तर,
स्वप्नी जे देखील रात्री । ते ते तैसेचि होतसे ।
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभुवनीं ।।


(म.टा. या वृत्तपत्राने घेतलेली दखल)


पोस्ट साभार :- इतिहासाच्या पाऊलखुणा (कौस्तुभ कस्तुरे)
Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive