पिरंगुटच्या तरुणांना लागलं विचित्र व्यसन???

      
(कोण आहे ह्या मागे ? कोणामुळे लागलय हे व्यसन ? )

     गेल्या तीन चार वर्षांपासून पिरंगुट गावातील तरुणांना एक वेगळचं व्यसन लागलंय. या व्यसनामुळे अनेक तरुण, समाजातील जेष्ठ मंडळी आणि महिला वर्ग सुद्धा भारावून गेलाय. अस कोणतं व्यसन असेल बरं? हे व्यसन आहे शिवभक्तीचं-शिवचरित्राचं आणि ज्याला शिवचरित्राचं व्यसन जडतं त्याला अन्य कोणतंही व्यसन स्पर्श करू शकत नाही. आणि या व्यसनाचं रूपांतर होतं देशभक्तीत-धर्मभक्तीत आणि समाजभक्तीत.
        काही वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी ठरवलं की, आपल्या जीवनाचे मार्गक्रमण शिवचरित्ररुपी अमृत पिवून करायचं. समाजात पसरलेल्या अज्ञान, अनास्था, दिशाहीनता या अंधकारात शिवचरित्राच्या प्रकाशात पथ चालण्याचा निर्धार केला. व त्यातुन एक उदात्त संकल्पना साकारली गेली. सामुहिक शिवचरित्र पारायण हीच ती संकल्पना, ज्या योगे तरुणांच्यात एक सकारात्मक ऊर्जा, नवचैतन्य, आत्मविश्वास जागा झालाय.
       आठवड्याच्या दर शनिवारी सायंकाळी ८ वाजता गावातील तरुण डोक्यावरती पांढरी टोपी घालुन श्री राम मंदिरात जमतात. श्री राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे वाचन करतात. इतर काही ताज्या घडामोडींवर चर्चा करतात त्यातून आपणांस काय घेता येईल व आपल्याकडून समाजास काय देता येईल याचा विचार करून कृती करतात. आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांनी रचलेले काही श्लोक तरुणांनी मुखोद् गत केले आहेत. ते सामूहिक म्हटले जातात, व तसे जगण्याचा निश्चयही मनोमन करतात. शिवचरित्र पारायणामुळे गावातील तरुणांची विचारांची दिशाच पालटली आहे. अनेक तरुणांना इतिहासाची गोडी लागली आहे. इतिहासाच्या वाचनातून आपण कोण होतो. काय आहोत, काय केलं पाहिजे, आपण कोणाचा वारसा चालवतोय याची जाणीव मनात उत्पन्न होत चाललीय. आजही शिवछत्रपतींसारखं अलौकिक कर्तृत्व आप-आपल्या क्षेत्रात गाजवण्याची गरज आहे. त्याची मनोमन निश्चिती होत चाललीय.
   खरं म्हणजे शिवछञपतींसारखं एक ब्रम्हास्त्र महाराष्ट्राने या भारतभुमिला दिलं. ज्यामुळे अनेक परकिय आक्रमणांवर मात करायला हजार हत्तीचं बळ इथल्या मावळ्यांमध्ये संचारलं. शिवजन्मापूर्वीची या हिंदुस्थान व महाराष्ट्राची जी काही परिस्थिती होती,  समाजाची काही मानसिक स्थिती होती ती शिवजन्मानंतर एवढी पालटली की त्यातून मराठी सत्तेचा उदय झाला. एक नवीन पर्व सुरू झालं. परकिय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापाखाली खचलेला, खंगलेला, पिंजलेला हा महाराष्ट्र पेटुन उठला. तत्कालीन आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, मोगलशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच यांना शिवछञपतींच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीतल्या मराठ्यांनी पाणी पाजले. त्यावर वचक बसविला. रयतेवर अन्याय, जुलुम, जबरदस्ती करणाऱ्या आक्रमकांच्या टोळधाडीवर ‘शिवशाहीने’ मात करून स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची पुन:स्थापना शिवछञपतींच्या हस्ते झाली. रायगडावर शिवरायांनी स्वतःला राज्यभिषेक करवुन घेऊन तत्कालीन सर्व सत्तांना हादरे दिले आणि रयतेसाठी सुखाचे समृद्धीचे आनंदवनभुवननिर्माण केले. शिवछञपतींच्या मृत्यूनंतरही मराठे अटकेपार गेले. मराठ्यांची घोडी साम्राज्यविस्तारासाठी चौखुर उधळत सुटली. अनेक परकिय  आक्रमकांच्या मनसुबे धुळीस मिळवीत हिंदुस्थानभर मराठ्यांचा दबदबा निर्माण केला. 
     हे सर्व कशामुळे झाले?  शिवछञपतींनी शेकडो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या हिंदू समाजाला जागं केलं. आपण कोण आहोत याची जाणीव करून दिली. स्वराज्यासाठी, रयतेसाठी, अस्मितेसाठी लढण्याची प्रेरणा दिली. गुलामीची बीजे रुजलेल्या समाजात विजयी मनोवृत्तीची बीजे पेरली. असंघटीतपणाचा शाप असलेल्या समाजात एकीची बीजे पेरली. या सर्वांना एकत्र घेवुन ’हिंदवी स्वराज्याचे स्वप्न’ प्रत्यक्षात उतरवलं.
      इतका दैदिप्यमान, विजयी वारसा असणारा हा महाराष्ट्र आज कोणत्या अवस्थेत आहे
        महाराष्ट्रातील तरुणांच्या आवडी-निवडी त्यांचे आदर्श, त्यांची ध्येयधोरणं, महत्वाकांक्षा काय आहेत?  हे जर समाजामध्ये डोकावुन पाहिलं तर प्रश्न पडतो की हा शिवछत्रपतींचाच महाराष्ट्र आहे कानाहीनक्कीच नाही...! व्यसनाने, भ्रष्टाचाराने बरबटलेला. स्वत्व स्वाभिमान नसलेला, राजकारण्यांनी दुभंगलेला हा महाराष्ट्र असू शकत नाही. हा महाराष्ट्र शिवछञपतींचे विस्मरण झालेला आहे.
             शिवछञपतींचे स्मरण म्हणजेच त्यांच्या इच्छा-आकांक्षेचे त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीचे स्मरण. त्यांच्या धारणेचा समाज तयार व्हायचे असेल तर शिवचरित्राचा अभ्यास करणारा, त्यावर चिंतन करणारा, त्यातून बोध घेवुन समाजासाठी, देव, देश, धर्मासाठी झटणारा तरुण उभा राहणं गरजेचा आहे. ही उणीव ओळखुन आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर फिरतायत. तरुण संघटीत करून त्यांच्या मध्ये शिवभक्ती रुजवतायत. गुरुजींनी तरुणांना साद घालणारे अनेक श्लोक लिहिले. श्लोकांमधून शिवछञपतींचे अंतरंग उलगडवुन दाखविले. गुरुजींचा एक श्लोकच शिवछञपती आम्हाला कसे पाहिजेत, कोणत्या स्वरूपात हवे आहेत.ते सांगतो 

अग्नी-दाहकता
मधु-मधुरता
 आदित्य-तेजस्विता
गंगा-निर्मलता 
हरी-अभयता 
कौटिल्य-चाणाक्षता
मारुती-गतिमानता
सहीत हे सारे कुठे राहती हे सारे शिवसुर्यरूप धरुनी हिंदू उरी नांदती

(पिरंगुट च्या तरुणांची शिवउपासना)
          शिवछत्रपती हे अनेक सद्गुणांची खाणच. हे सर्व गुण तरुणांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी गुरुजींनी अनेक उपक्रम समाजासमोर ठेवले आहेत. भिडे गुरुजींच्या या हाकेला प्रतिसाद देत पिरंगुट मधील तरुण मरगळ झटकुन कामाला लागलेत. आप-आपल्या संसार, नोकरी, शिक्षण, व्यापार सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आयुष्यातील वाया जाणार वेळ या कार्यात देत आहे. तरुण संघटित करत आहेत. तरुणांना इतिहासाची गोडी लावत आहेत. ‘साप्ताहिक शिवचरित्र पारायण’ यासारखे दर्जेदार उपक्रम पिरंगुटच्या सिमा ओलांडून जवळच्याच भुकुम, सुतारवाडी, लवळे या गावांमध्ये पोहचलेत. त्या-त्या भागातील जेष्ठ मंडळी, माता-भगिनी, तरुण मोठ्या संख्येने, निःस्वार्थ भावनेने या कृतीशील शिवभक्तीत तल्लीन झाले आहेत.
        शिवचरित्राचा परिसस्पर्श या मावळ मुलखातल्या तरुणांना झाला तर पुन्हा एकदा ज्या प्रमाणे शिवछञपतींना पुण्याखालच्या बारा मावळंनी साथ दिली त्या मावळ्यांची प्रतिबिंब पहायला मिळतील. निःस्वार्थ, निर्व्यसनी, संस्कारक्षम, त्यागी, प्रखर देशाभिमानी तरुण या मुळशी मावळातुन पुन्हा एकदा पहायला मिळतील. हाच ध्यास घेवुन पिरंगुट मधील तरुण काम करत आहेत. गावामध्ये दरवर्षी अनेक उपक्रम राबवीले जातात त्यापैकी ‘धर्मवीर बलिदानमास, गडकोट मोहीम, श्री दुर्गामाता दौड’ यातुन समाजमनावर सकारात्मक परिणाम होत चाललाय. या वर्षीच्या श्री दुर्गामाता दौडीचे नेतृत्व भगव्या ध्वजाचा मान स्विकारुन मुळशीचे नायब तहसिलदार श्री. नागेशजी गायकवाड यांनी केले. तेही एवढे संघटीत तरुण पाहुन भारावुन गेले. सुतारवाडी, भुकुम, लवळे या गावातही ही कृतीशील शिवभक्ती रुजत चाललीय. तिथेही तरुण एकजुटीने उभे राहिलेत. तरुणांच्या विचारांमध्ये पालट दिसु लागलाय. अनेक तरुण अभ्यासु झालेत. कोणी बोलते झालेत. कोणी लिहीते झालेत.
           खरंच हा परिसस्पर्श समाजातील प्रत्येक तरुणाला करून देणं हीच काळाची गरज आहे. यातुन कणखर समाजमन, धडधाकट तरुण मनगटे घडतील. यासाठी आपण सर्वांनी झटूया. हे तरुण अशी साद घालतायत . हे सर्व करतायत ती कोणतीही अभिलाषा न ठेवता. हे तरुण जे करत आहेत ते आ.संभाजीराव भिडे गुरुजींच्या पुढील श्लोकाच्या साराप्रमाणे-
      नको मान सन्मान आम्हांस कांही ।
    जगूं मायभूच्यास्तवें हीच ग्वाही ।
    त्वरें निर्मू निष्ठा प्रत हिन्दूदेहीं ।
    करू राष्ट्रसेवा बनोनी विदेही ।।

।। राष्ट्रार्थ निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ ।।

-विनोद पाटनकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
पिरंगुट विभाग (मुळशी, पुणे)



Share:

5 comments:

  1. महामंत्र आहे नव्हे शब्द साधा ।
    जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच्छबाधा ।।
    नुरे देश अवघा जयाचे अभावी ।
    'शिवाजी' जपू राष्ट्रमंत्र प्रभावी

    ReplyDelete
  2. वा धारकऱयांनो मुजरा तुम्हास आम्ही ही लवकरच ही मोहीम हाती घेऊ शिवचरित्र पारायण ची तुमच्या मुळे आम्हांस ही नवीन कार्यक्रमाला प्रेरणा मिळाली धन्यवाद सर्वांचे

    ReplyDelete
  3. जय श्रीराम
    जय शिवराय

    ReplyDelete
  4. शिवबा कशास्तवे कसे जगले स्मरुया ।
    शिवसुर्यमार्ग विजयार्थ उठा धरुया ।।
    मनीषा अपूर्ण परिपूर्ण करावयास ।
    #विजयी_रणात_करूया_भगव्याध्वजास ।।

    ReplyDelete

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive