आध्यात्म आणि परमार्थ या दोहोंकडे वळलेल्या व्यक्ती या काही औरच असतात. मुळात त्यांचा जन्म म्हणजे साक्षात दैवी अवतारच. जन्मापासून मृत्युपर्यंत या व्यक्ती अखंड धर्मसेवा करण्यात गुंग असतात. पण या अलौकिक कार्याचा तिळमात्र गर्व त्यांच्या अंगाला शिवत नाही; म्हणूनच त्यांची छाप हि अखंड मनुष्य मात्रावर पडते. महाराष्ट्र या बाबतीत गर्भश्रीमंत आहे. या हिंदुस्थान भूमीला प्रत्येक शतकात अशी पावले लाभली. अशीच एक व्यक्ती परमार्थिक आणि अध्यात्मिक शिकवण प्रापंचिक जीवनात देऊन कित्येकांचे आयुष्य मार्गी लावून गेले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात;
प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥
या ओळीप्रमाणे आपल्या प्रापंचिक जीवनासोबत अनेकांच्या प्रपंचात त्यांनी आध्यात्माची सांगड घातली. मग असे पुण्यस्वरूप व्यक्तिमत्त्व कोणाचे? तर ते आहेत श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज.
जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला | जयाते सदा वास नामात केला |
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती |
नमस्कार त्या ब्रम्हचैतन्य मुर्ती ||
|
गोंदवलेकर महाराज हे सातार्यात जिल्ह्यात गोंदवले-बुद्रुक गावी जन्मलेले अद्भुत चैतन्यच जणू. अखंड रामनाम जप मुखी. त्यांची आई गीताबाई महाराजांच्या तीन खूना सांगत त्या म्हणजे, महाराज हे दिसायला मोठे सुंदर, बोलण्यात चतुर आणि तिसरे म्हणजे मुखी अखंड रामनाम. महाराजांच्या घराला वारकरी संप्रदायाचा अखंड वारसा होता. त्यांचे वडील रावजी आणि आई गीताबाई. या दाम्पत्याच्या पोटी बुधवारी माघ शुद्ध द्वादशी शके (इ.स. १९ फेब्रुवारी १८४५) सूर्योदयी महारांजाचा जन्म झाला. महारांजाचे पाळण्यातले नाव “गणपती”. लहान वयातच त्यांना भगवद् भजनाची ओढ लागली. ते जस जसे मोठे होत होते तस तसे त्यांच्या अंगी असलेले रामनामाचे वेड वाढत गेले. मुंज झाल्यावर उपाध्यांकडून त्यांनी सारी विद्या शिकून घेतली. पण मात्र गुरुशोधाकडे धावू लागल.अखेर या विचाराने व्याकुळ झालेला अवघा नऊ वर्षाचा बालक आपल्या दोन सहकार्यांसह गुरुशोधार्थ पळून गेला. पण लवकरच आईवडिलांच्या हाती लागल्याने सगळे कष्ट वाया गेले. अखेर ११ व्या वर्षी त्यांच लग्न झाले. पण जीव मात्र गुरुशोधासाठी तळमळत होता. शेवटी १२ व्या वर्षी आईला कल्पना देऊन एका लंगोटीवर रात्रीच्या अंधारात ते पुन्हा पळून गेले. आणि गुरुशोधार्थ त्यांनी भारत भ्रमंती सुरु केली. या भ्रमणात महाराजांना अनेक संतांच्या भेटी झाल्या. हरिपूर (सांगली) येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष आण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्रीस्वामी , हुमणाबादचे माणिक प्रभु , काशीचे तैलंगस्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस, या सर्वांनी प्रेम भावाने जवळ केले खरे पण या कोणाकडेच गुरुलाभ झाला नाही. अखेर गोदातीरी श्रीसमर्थसंप्रदायी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहळेगांवच्या श्रीतुकारामचैतन्यांकडे जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले. नऊ महिने तेथे त्यांनी अविरत गुरुसेवा केली. गुरूंना कठोर परीक्षा घेऊन पटले कि, त्यांची देहबुद्धि पूर्णपणे नष्ट झाली आहे. संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि ब्रम्हचैतन्य असे नाव ठेवले. मनासारखा सद्गुरु भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली. ’आत्मज्ञान अंगी मुरविण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे’ ही गुरुआज्ञा शिरसावंद्य करून ते निघाले. |
घरी आल्यानंतर माहेरी वाट पाहत असलेल्या पत्नीला घेऊन आले. तिला परमार्थ शिकवला.गुरुदर्शन दिले. परंतु त्या अल्पकाळच राहिल्या. त्याना फार कमी वेळेतच देवाज्ञा झाली. आईच्या हट्टापायी महाराजांनी जन्मतः अंध असणार्या मुलीसोबत लग्न केले पुढे भक्त मंडळी त्यांना आईसाहेब बोलू लागले.
महाराजांनी गावी येऊन लोकाना प्रपंचात राहून परमार्थ करावयास शिकवला. त्यांचे भक्त वाढत गेले. त्यामुळे त्यांनी १८९० साली आपल्या वाड्यात श्री राम, लक्ष्मण सीता आणि मारुती यांची स्थापना केली. पुढे हि संख्या वाढत असल्यामुळे गावी राममंदिर, दत्तमंदिर आणि शनिमंदिराची स्थापना केली. तसेच धर्मशाळा ही स्थापली.
(श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर ) |
गोंदवलेकर महाराज म्हणजे उपासना भक्तीचे एक अद्भुत सौंदर्य. पोहणे, पळणे, घोड्यावर बसणे, झाडावर चढणे, उत्तम काव्य करणे. सुंदर हस्ताक्षर, अप्रतिम पाठांतर हे गुण उपजत होतेच. त्यांना बाजरीची भाकरी, पिठले आणि जाड भरडे आवडे. महाराजांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे; त्यांना लहानपणा पासून अन्नदानाची खूप आवड. . इ. स. १८७६ व १८९६ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्रीमहाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून वाचविले.
प्रपंचात अध्यात्माची जोड असेल तर आपले आयुष्य सुखमय होते हे महारांजानी शिकवलेच पण त्याच बरोबर भगवंत नामाचा हि माहीमा त्यांनी दाखविला. ते अखंड नाम जगले. देह ठेवताना हि त्यांनी नामाचे महत्व सांगितले. सोमवार, मार्गशीर्ष कृ.दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता
“जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण.”
हे शेवटचे शब्द उच्चारून, या भगवंत नामी शब्दानेच त्यांनी देह ठेवला.
साभार :- श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज संकेतस्थळ.
*श्री गोंदवलेकर महाराजांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट दया:-
http://shrigondavalekarmaharaj.org/maharaj_home/wyaktidarshan
No comments:
Post a Comment