हिंदूंना मनुस्मृती जितकी प्रिय नाही तितकी प्रिय ती मनुस्मृती जाळणार्‍यांना आहे....

           

         प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. प्रभू रामचंद्र यांचे शौर्य आणि भगवान श्रीकृष्ण यांचे गीतेतील तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्यासाठी आपण रामायण आणि गीतेचे पारायणे करतो. कृष्णजन्माष्टमी आणि राम नवमी साजरी करतो. रामाने रावणाचा वध केला म्हणून आपण दसर्‍याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो. यामागे श्रीरामांच्या शौर्याचे स्मरण करणे हा हेतू आहे. रावणाचा पुतळा दहन करणे हा मूळ हेतू नसून जसे रामाने रावणाला मारले तसे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍या प्रत्येक शत्रूची भारतीय रक्षणा प्रणाली आणि न्याय प्रणाली हिच अवस्था करेल, हा संदेश त्यातून दिला जातो. रावणाचे दहन करताना सुद्धा त्याच्याविषयीचा द्वेषभाव लोकांच्या मनात नसतो. तो आनंद सोहळा म्हणूनच लोक साजरा करतात. रावण मेला त्याक्षणी त्याचे आणि आपले शत्रूत्व संपले अशी श्रीरामाची धरणा होती. इंग्रज देशातून निघून गेल्यास इंग्रज आपले शत्रू राहणार नाही, अशी भावना सावरकरांची होती. प्रवचनकार तर असे सांगतात की रावणाचा पुतळा दहन करताना आपल्या मनातील रावणाचे म्हणजेच दुष्ट विचारांचे दहन करतोय असा दिव्य हेतू मनात ठेवावा. आपल्या पूर्वजांचा इतिहास प्रेरणा घेण्यासाठी जीवंत ठेवला जातो. आपल्या पूर्वजांच्या शत्रूंचा द्वेष करण्यासाठी नव्हे. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, अनन्वित छळ केला म्हणून आपण आता त्यांच्या नावाने बोटे मोडत बसत नाही.

आता रावण दहन आणि मनुस्मृती दहन यावर आपण विचार करुया. २५ डिसेंबर रोजी काही लोक मनुस्मृतीचे दहन करतात. या गोष्टीचा विचार करण्याचे कारण म्हणजे गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी, मोदींचा संविधानावर नाही, तर मनुस्मृतीवर विश्वास आहे असे म्हणाले. त्यांना मोदींना मनुस्मृती आणि संविधान यांच्यातून एकाची निवड करण्यास सांगायचे आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे जिग्नेश मेवाणी यांचे प्रथम कर्त्यव्य ते गुजरातच्या ज्या विभागातून निवडून आले आहेत, त्या विभागात त्यांनी लक्ष दिले पाहिजे. कारण ते आता आमदार आहेत. याचे भान त्यांना बर्‍याचदा राहत नाही. पण तो त्यांचा प्रश्न आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. तर मला असे वाटते की खरे मनुवादी हे जिग्नेश मेवाणीच आहेत आणि मेवाणींसोबत जे जे मनुस्मृतीचे दहन करतात ते ते सर्व खरे मनुवादी आहेत. 

एखादा वाद म्हणजे विचारप्रणाली जीवंत ठेवण्याचे काम जे लोक करतात तेच खरे त्या विचारांचे पाईक असतात. असे बोलले जाते की पूर्वी मनुस्मृतीप्रमाणे भारताची रचना चालायची. खरे खोटे मला माहित नाही. मी त्या विषयीचा अभ्यासक नाही. मी मनुस्मृती वाचलेली नाही. त्यामुळे मनुस्मृतीवर टिका किंवा स्तुती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण जे जे मनुस्मृतीवर टिका करतात त्या सर्वांनीच मनुस्मृती वाचलेली आहे, असे आपण गृहित धरायला हरकत नाही. कारण अभ्यासाशिवाय बोलणे हे आंबेडकरी विचाराप्रणालीला अशोभनीय आहे. त्यामुळे त्या सर्वांनी मनुस्मृती वाचण्याचे कष्ट घेतले आहे व त्यातील फोलपणा समाजास दाखण्याचे उदात्त कार्य केले आहे. हे उदात्त कार्य मनुस्मृती जाळण्यापर्यंत गेले आहे. रावणाचे दहन करताना रामाच्या शौर्याचे स्मरण असा विचार आहे. पण मनुस्मृती जाळणार्‍यांच्या मते मनुस्मृतीने लोकांवर अन्याय केला आहे आणि मनुस्मृती हे अन्यायाचे प्रतीक आहे, असे ते मानतात. मग मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्याचे प्रयोजन काय आहे? जनतेवर झालेल्या अन्यायाची आठवण म्हणून मनुस्मृती जाळली जाते का? कारण मनूच्या विरोधात कुणीही बंडखोर उभा राहिला आणि त्याने मनूला आव्हान दिले असे ऐकीवात नाही. आता वॉट्सअपी नवइतिहासकारांचे युग आहे. कोणताही पुरावा, कोणतेही तर्क न लावता इतिहास सांगण्याची किंवा बदलण्याची एक नवी पद्धत नव्याचे जन्माला येत आहे. त्यामुळे भविष्यकाळात कुण्या मूलनिवासी क्रांतिकाराने मनूच्या विरुद्ध बंड केले असा इतिहास जर सांगितला गेला तर नवल वाटून घेण्याचे कोणतेही कारण नसावे. पण आता तरी असा नवइतिहास कुणी सांगोतलेला नसल्यामुळे मनूच्या विरोधात कुणीही बंड केले नाही, असे मानायला हरकत नसावी. तर मनुस्मृती जाळण्यात असा कोणताही उदात्त हेतू सध्या तरी दिसत नाही. एकेकाळी भीमरावांनी मनुस्मृती जाळून घेतली, म्हणून स्वतःस त्यांचे अनुयायी म्हणवणारे मनुस्मृती जाळतात का? मग गांधींनी विदेशी कपड्यांची होळी केली हा पराक्रम समजून सर्व गांधीवाद्यांनी दरवर्षी विदेशी कपडे जाळण्याचे प्रयोजन केले तर कोण प्रसंग उभा राहिल याची कल्पना न केलेलीच बरी. 

मी स्वतःस हिंदूत्ववादी म्हणवून घेतो. त्या योग्य मी आहे की नाही हे समाज ठरवेल. पण हिंदूत्ववादी म्हणवून घेताना अनेक हिंदूत्ववादी लोक भेटतात. तसेच जन्माने हिंदू असलेल्या अनेक लोकांना मी ओळखतो. ब्राह्मणांनाही ओळखतो. त्यापैकी एकानेही मनुस्मृती वाचल्याचे जाणवले नाही किंवा मनुस्मृतीवर आम्हा हिंदूत्ववाद्यांची कधीच चर्चा रंगली नाही. मनुस्मृती ही खरोखरच योग्य होती की अयोग्य होती हा अभ्यासाचा विषय आहे. मी सावरकरांच्या विचारांनी प्रेरीत असल्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की जुने कोणतेही ग्रंथ मग ती गीता असो, मनुस्मृती असो, कुराण किंवा बायबल असो हे सर्व ग्रंथ फार फार तर वाचनीय असतील पण अनुकरणीय मुळीच नाहीत. त्या त्या ग्रंथात जर असे कोणतेही विचार असतील जे आजच्या युगासाठी कालबाह्य आहेत तर ते विचार केवळ वाचनीयच आहेत, अनुकरणीय होऊ शकत नाहीत. हिंदू म्हणून विचार करताना मला अतिशय अभिमान वाटतो की हिंदूंनी वेळोवेळी आपल्या कालबाह्य या तत्वानुसार अनिष्ट प्रथा मुळतून काढून टाकल्या आहेत. बाल विवाह, एकापेक्षा अनेक विवाह, विधवेस पुनर्विवाह न करु देण्याची प्रथा असो. या सर्व प्रथा स्वतः हिंदूंनी झिडकारुन लावल्या आहेत. त्यामुळे हिंदूंमध्ये मनुस्मृती-वृत्ती आहे असा आरोप लावणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य जनतेने जशी मनुस्मृती वाचली नाही, तसे त्यांनी संविधानही वाचलेले नसते. सामान्य माणसाला फक्त रोजच्या आयुष्यातील अडचणी सतावत असतात. आता हे भारत सरकारचे कर्तव्य आहे की संविधानाबद्दलचे धडे मुलांना शालेय जीवनापासून गिरवायला लावले पाहिजे. 

हिंदूंना मनुस्मृती जितकी प्रिय नाही तितकी प्रिय ती मनुस्मृती जाळणार्‍यांना आहे. कारण आपल्याकडे एक फॅड आहे की पाश्चात्य जगताने आपल्याच एखाद्या गोष्टीला मान्यता दिली तर ती आपण डोक्यावर घेतो. कुणाही हिंदूच्या मनात मनुस्मृती नाही. मग तरीही मनुस्मृती जाळली जाते, जिग्नेश मेवाणी सारख्या अनेक लोकांकडून तिची वारंवार स्मृती जागवली जाते, तर ही मनुस्मृती नेमकी काय भानगड आहे? हे जाणून घेण्याचे दुष्ट विचार जर एखाद्या पाश्चात्य माणसाच्या मनात आले आणि त्याने मनुस्मृतीचा अभ्यास करुन त्याचे इंग्रजी भाषेत भाषांतर करुन गोडवे गायले तर बिच्चार्‍या मनुस्मृती जाळणार्‍यांना ती पाश्चात्य आवृत्ती सुद्धा जाळावी लागणार आहे. असे होऊ नये आणि जगभरातल्या लोकांना मनुस्मृतीचे आकर्षण वाटू नये म्हणून मनुस्मृती जाळणार्‍यांनी मनुस्मृती हा शब्द मनात सुद्धा उच्चारता कामा नये. नाहीतर जगात मनुस्मृतीविषयीचे आकर्षण वाढले जाईल आणि मनुस्मृती अजरामर होईल. ती आताही अजरामर करण्यात येत आहे, पण हे कृत्य हिंदूंकडून होत नसून मनुस्मृतीचा द्वेष करणार्‍यांकडून होत आहे. आता जिग्नेश मेवाणींना नरेंद्र मोदींसमोर मनुस्मृती आणि संविधान ठेवून दोहोंपैकी एकाची निवड करायला सांगायचे आहे. नरेंद्र मोदी संविधान निवडतील यात तीळमात्र शंका नाही. पण जिग्नेश मेवाणींना एक गोष्ट कळत नाही की मोदींनी संविधान निवडल्यानंतर जिग्नेश मेवाणींच्या हातात मनुस्मृतीच राहणार आहे आणि मग त्यांना आपल्या हातातील मनुस्मृती जाळावी लागणार आहे. ते जाळत राहतील व मनुस्मृती अजरामर करत राहतील. म्हणूनच मी म्हणतो हिंदूत्ववादी हे संविधान मानणारे आहेत आणि जिग्नेश मेवाणी व मनुस्मृती जाळून व वारंवार त्याबद्दल बोलून मनुस्मृतीस जगभरातल्या लोकांचे लक्ष जावे असे प्रयत्न करणारे खरे सनातनी आहेत. असो...!   

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)