( हुतात्मा क्रांतिकारक भगत सिंगाना नास्तिक म्हणून आदर्श ठेवायचे का राष्ट्र कार्यासाठी याचा सारांश देणारा आजचा हुतात्मा दिनानिमित्त लेख ) |
'मी नास्तिक का आहे???'
हुतात्मा भगतसिंगांची ही छोटीशी पुस्तिका वामपंथी, साम्यवादी मंडळींकडून तरुणांमध्ये विशेषरुपाने प्रसृत केली जाते आहे, जिचा उद्देश्य तरुणांना त्यांच्यासारखं महान बनविणे नसून केवळ नास्तिकता वाढविणे हा आहे. काही जण ह्याला भगत सिंगांच्या स्कंधांवर ठेवली जाणारी बंदुक व साध्य दुसराच असे समजु शकतात. माझा अशा लोकांना एक साधा प्रश्न आहे की ते आपले आदर्श कोणत्या कारणासाठी असावेत ? केवळ नास्तिक म्हणून भगत सिंग आपले आदर्श असावेत का? की ह्या कारणासाठी असावेत की ते एक प्रखर राष्ट्रभक्त होते व कोणत्याही परिस्थितींत आपल्या सिद्धांतास तडजोड न करणारे एक अमर हुतात्मा होते म्हणून? खरंतर सर्वजण म्हणतील की ह्यासाठीच की ते राष्ट्रभक्त होते म्हणूनच ते आदर्श आहेत. त्यांचे योगदान भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष असल्याने त्यांचे स्थान इतके मोठे आहे की त्यांच्यावर इतर कोणतीही संदिग्ध विचारधारा थोपविणे आवश्यक नाही. ह्या प्रकारच्या छुप्या प्रचाराने भावनाशील व अपरिपक्व मनाच्या तरुणांना भगतसिगांच्या समग्र व परिपूर्ण व्यक्तिमत्वापासून दूर ठेऊन आपला राजकीय उद्देश्य तर साधला जाऊ शकतो, पण त्यावरून भगत सिंगांच्या आदर्शावर चालणारा समाज मात्र नाही निर्माण करता येणार हे मात्र निश्चित !
कोणत्याही क्रांतिकारकाच्या राष्ट्रभक्तीबरोबरच त्याची अध्यात्मिक विचारधारा जर आपल्यासाठी आदर्श असु शकेल, तर मग भगत सिंगांचे अग्रज, महान कवी आणि लेखक, भगत सिंगांसारख्या अनेक युवकांचे मार्गदर्शक, ज्यांनी महर्षी दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश वाचूनच आपल्या जीवनांत क्रांतिकार्याचे स्फुल्लिंग चेतविले, एक कट्टर आर्य समाजी पंडित श्री रामप्रसाद बिस्मिल; हे असे होते की ज्यांचे समग्र जीवन नैष्ठिक ब्रह्मचर्य पालनाने होणार्या लाभाचे साक्षात् प्रतिबिंबच होते, ते आमच्यासाठी आदर्श का होऊ नाही शकत???
क्रांतिकारक सुखदेव थापर हे तर वेदांपासून अत्यंत प्रभावित झाले होते व आस्तिक होते आणि संयमी जीवनांवर त्यांची श्रद्धा होती. स्वत: भगत सिंग त्यांच्या पत्रात त्यांच्या ह्याभावनेचे वर्णन करतात. हे आमच्यासाठी आदर्श का होऊ शकत नाहीत????
आर्य समाज माझी आई आहे व वैदिक धर्म माझा पिता आहे असा उद्घोष करणारे लाला लजपत राय, ज्यांनी कृषी आंदोलनाचे नेतृत्व करण्यापासून ते बौद्धिक उच्च वर्गातही राष्ट्रभक्तीची प्रखर चेतना जागृत केली आणि सायमन कमिशनचा विरोध करतानाच आपले प्राण देशासाठी अर्पित केले! हे आमचे आदर्श का होऊ शकत नाहीत? की केवळ हे आस्तिक होते म्हणून?
वास्तविक पाहता देशभक्तांप्रतीच्या श्रद्धा व सन्मानासाठी ते देशभक्त होतेच इतकंच पुरेसं आहे व त्यांनी ह्या राष्ट्राच्या भल्यासाठी आपला व्यक्तिगत स्वार्थ, त्याग आणि स्वप्नांसहित आपल्या जीवनाचे जे बलिदान दिले, तेच महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांची अध्यात्मिक विचारधारा कोणती होती ह्यावरून त्यांच्या आदरांत कोणतीही वृद्धी अथवा न्यूनता येत नाही. रामप्रसाद बिस्मिलांच्या बलिदानाचा आदर करताना अशफाक उल्ला खान हे केवळ मूस्लीम होते म्हणून त्यांचे अवमूल्यन करणे, ही गोष्ट केवळ मूर्खपणाचीच म्हणावी लागेल.
अशा सहस्त्रो क्रांतिकारकांचे तपशील दिले जाऊ शकतील की ज्यांनी मातृभूमीच्या सेवेसाठी केवळ आपले प्राणच त्यागले नाहीत, तर ते व्यक्तिगत रुपांत आस्तिकही होते. त्यांच्या बलिदानांत व भगत सिंगांच्या बलिदानांत काही अंतर आहे का? नाहीच. तर मग हा अन्यायच नाही तर काय आहे?
आता हा विचार करणे आवश्यक आहे की भगत सिंगांची नास्तिकता खरंच नास्तिकता आहे का? मृत्युवेळी त्यांचे वय अवघं २३ होतं. त्यावेळी भारतावर दोन महान संकटे होती. सन १९२१ मध्ये ऐन कळीचे विषय असणार्या खिलाफत चळवळींस केमाल पाशाने स्थगिती देतांच काँग्रेस व मूस्लीम संघटनांचे हिंदु-मुस्लीम एकतेचे मनोरे ढासळायला सुरुवात झाली आणि संपूर्ण भारतांत दंगली उसळल्या. भगत सिंगांना हा हिंदु-मुस्लीम संघर्ष स्वातंत्र्यप्राप्ती आंदोलनांतली मोठी समस्या वाटली, ज्यामागे वस्तुत: इंग्रजांची 'फोडा आणि राज्य करा' ही कुटनीती होती. ह्या विचारमंथनातून परिणामास्तव भगत सिंगांना 'धर्म' शब्दाचीच घृणा वाटु लागली. त्यांना दंगलींचे कारण धर्म हेच प्रमुख वाटु लागलं. ह्या मंतव्यांस त्यांचे त्याकाळातील मार्क्सवादी साहित्याचे अध्ययन हेसुद्धा कारणीभूत होतंच. वस्तुत: दंगलींच्या पाठी धर्म हे कारण नसून मतमतांतरांतील भेदाची संकुचित मानसिकता हे होते. धर्म हा मनुष्यांस सार्वकालिक व सार्वभौमिक पुरुषार्थरुपी श्रेष्ठ कार्य करण्यांस प्रवृत्त करतो. ह्या उलट विशिष्ट मत किंवा पंथ किंवा संप्रदाय हे अल्पकालिक व पूर्वग्रहदूषित अशा संकुचित विचारधारेचे नाव आहे ज्यात त्याच्या प्रवर्तकाचा संदेश हा अंतिम सत्य असतो. मार्क्सवादी साहित्याचा सर्वात मोठा दोष हा धर्म व पंथ (संप्रदाय) ह्यांतला भेद न कळणं किंवा कळूनही न घेणं हाच आहे.
त्याकाळी इंग्रजांच्या विध्वंसकारी योजनांमुळे भारतात दारिद्र्याने सीमा गाठली होती व अवर्षण(दुष्काळ), पूर, भूकंप, प्लेग आदि संकटे आल्यांस त्यांच्या निवारणाची योग्य नि पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांचे स्वरुप भयंकर विराट स्थितींस प्राप्त होई. अशा स्थितीत सर्वत्र दारिद्र्य, अन्नान्न दशा, रोगराई ह्या सर्वांस पाहून एक देशभक्त युवकाचे निर्मल अंत:करण व्यथित होणं स्वाभाविक होतं. परंतु ह्या सर्व अनावस्थेचे श्रेय इंग्रजांची अन्यायी राजवट, परस्पर भेदाभेद, शिक्षणाचा व रोजगाराचा अभाव, अंधश्रद्धा ह्या सर्वांना न देता ईश्वरांस देणं म्हणजे कठीण विषयांत अंतिम निष्कर्ष गाठायच्या आधीच घाई करणं आहे. दुर्दैवाने भगत सिंगांनी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षीच देशस्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलं, अन्यथा काही काळ गेला असता त्यांना 'संसारातील दु:खांचे अस्तित्व हे ईश्वरांच्या अनस्तित्वाचाच सिद्धांत आहे' ह्या त्यांच्या विचारांत परिवर्तन होऊन त्यांनी हे मत त्यागलंही असतं.
विश्वातील दु:खांचे कारण ईश्वर नसून मनुष्य स्वत: आहे. ईश्वराने मनुष्यांस त्याच्या निर्मितीवेळीच आरंभीसच चार वेदरुपी उपदेश देउन त्याने काय करावं नि करु नये हे सांगितलंच आहे. अर्थात सत्य-असत्याचा बोध त्यांस केला आहे. आता हे सर्वस्वी मनुष्यांचे कर्तव्य आहे की सत्याचा मार्ग स्वीकारणे व असत्याचा त्याग. परंतु मनुष्य हा अज्ञानतेने असत्याचा मार्ग स्वीकाल्यामुळेच अध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा तीन्ही प्रकारच्या दु:खांस प्राप्त करतो. मनुष्य त्याच्या सामर्थ्यानुसार कर्म करण्यांस स्वतंत्र आहे हा निश्चित सिद्धांत असून त्याच्या कर्मानुसार त्याची फलप्राप्ती हा ही निश्चित सिद्धांत आहे. ज्याप्रमाणे उत्तम अध्ययन केलेला विद्यार्थी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करतो पण न केलेला विद्यार्थी अपयशी होतो, तर मग आता ह्याचा दोष ईश्वराचा आहे की त्या विद्यार्थ्याचा? अशीच अवस्था विश्वातल्या कोणत्या कर्मांस नाहीये? सर्वच कर्मांत असल्यामुळे हीच ईश्वरप्रणीत कर्मफल व्यवस्था आहे. मग असे असताना कोणत्याही प्रकारच्या दु:खाचे खापर ईश्वरावर फोडणे व त्यानुसार ईश्वराचीच सत्ता नाकारणे हे चुकच आहे. भगत सिंगांची नास्तिकता ही आजच्या वामपंथी नास्तिकांची नास्तिकता नव्हे. ही एका २३ व्या वर्षाच्या उत्साही, देशभक्त युवकाची क्षणिक प्रतिक्रिया आहे, जो तत्कालीन व्यवस्थेप्रतीचा त्याचा आक्रोश आहे.
भगत सिंगांची पारिवारिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची व्यक्तिगत जीवनशैली यांतून हे सिद्ध होतं की कोणत्याही आस्तिकापेक्षा आस्तिकतेत तींस काही न्यूनता नव्हती. त्यांनी कधीच परोपकारी वृत्तीचा त्याग केला नाही, भले त्यामुळे त्यांस काही हानी ही झाली. महर्षि दयानंदांनी ह्या परोपकाररुपी ईश्वराज्ञेंचे पालनासच धर्म संबोधिले असून प्राणसंकट आले तरी त्यापासून विचलित न होणे हेच सांगितलंय. भगत सिंगांचे समग्र जीवन ह्याच धर्माज्ञांच्या पालनाचे अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. म्हणूनच त्यांच्या आस्तिकतेचे मूल्यमापन कोणत्याही प्रकारे कमी लेखलं जाऊ शकत नाही.
इथे हा विषय घेण्यामागे माझी मनीषा हीच आहे की भारतमातेच्या चरणी प्राणांची आहुती देणारा प्रत्येक क्रांतिकारक हा आमच्यासाठी महान आणि आदर्शच आहे. त्याची वीरवृत्ती नि देशसेवा आमच्यासाठी वंदनीयच आहे. भगत सिंगांच्या क्रांतिकारक विचारधारेचे व देशभक्तीचे श्रेय नास्तिकतेंस नसून त्यांच्या पूर्वजांद्वारा मातेच्या स्तन्यातून गायिली गेलेली देशभक्तीगीते आहेत, ज्याचे सारे श्रेय महर्षि दयानंद, कर्तार सिंग साराभा, भाई परमानंद, लाला लजपतराय, प्रा. जयदेव विद्यालंकार, भगत सिंगांचे आजोबा आर्यसमाजी सरदार अर्जुन सिंग आणि त्यांचे कुटुंबीय, शीख गुरुंच्या बलिदानांच्या कथागानांस ह्या सर्वांस जाते, ज्यांच्या प्रेरणेचे बाळकडु त्यांस बालपणीच प्राप्त झाले आणि जे निश्चित रुपाने आस्तिकच होते. भगत सिंगांच्या महानतेंस नास्तिकतेच्या तुलादानांत तोलणे हा साम्यवाद्यांचा त्यांच्याप्रती अन्यायच आहे. तसे पाहता साम्यवाद्यांच्या दुटप्पी मानिसकेतेचे दर्शन आपणांस तेंव्हाही होते, जेंव्हा ते भगत सिगांनी गोरक्षेसाठी केलेले कुका आंदोलन व स्वातंत्र्यासाठी वंदे मातरम उद्घोषासाठीच्या केलेल्या आंदोलनांस समर्थन देण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. कारण ते सर्व त्यांच्या साम्यवादी पक्षाच्या विचारसरणींस विरुद्ध आहे म्हणून. शेष सूज्ञ वाचक स्वत: ह्या विषयांस समजण्यांस समर्थ आहेत.
- मूळ हिंदी लेख - डॉ. विवेक आर्य
अनुवादित लेखक - तुकाराम चिंचणीकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
पंढरपूर विभाग
No comments:
Post a Comment