सबंध भारतात सध्या सकारात्मक वातावरण आहे. पण ते सकारात्मक वातावरण नकारात्मक आहे, असे ओरडून सांगण्याची नवी पद्धत जन्माला आली आहे. इतकी वर्षे कॉंगेसचे सरकार असताना सर्व काही आलबेल होते आणि गेल्या तीन चार वर्षात भारत कसा असहिष्णू झाला आहे, असे जाणीवपूर्वक सांगितले जात आहे. कॉंग्रेसच्या काळात असंख्य भ्रष्टाचार झाले व आज ते क्रमाक्रमाने उघड होत आहेत. पण ते प्रत्यक्षात उघड होण्याआधी भारतीय जनतेच्या मनात उघड झाले. म्हणजे कॉंग्रेस हा पक्ष देशकारभार करण्यास सक्षम नाही, तो केवळ एका कुटूंबाला बांधलेला आहे, हे भारतीय जनतेने ओळखले आणि २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार प्रचंड बहुमताने लोकशाही मार्गाने निवडून आले. नरेंद्र मोदींची लाट ओसरली आहे असा कांगावा करत असतानाच मोदींनी उत्तर प्रदेश काबीज केला. गेली २५ वर्षे त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता होती. आता प्रचंड बहुमताने भाजपची सत्ता लोकशाही मार्गाने स्थापन झाली आहे. भाजपने ६० पैकी ३५ तर आयपीएफटीने ८ जागा जिंकल्या असून तब्बल ४३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. माकपला फक्त १६ जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला इथे खाते सुद्धा उघडता आले नाही. हा विजय म्हणजे संघाने ईशान्य भारतात केलेल्या कार्याची पावती आहे. स्वतःला कट्टर म्हणवून घेणारे हिंदू सुद्धा अशा भागात जाऊन काम करण्यास धजावत नाहीत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सर्वसामान्य मवाळ स्वयंसेवक अशा ठिकाणी जाऊन कार्य करतो. सर्व स्वयंसेवकांची आणि प्रचारकांची करावी तेवढी स्तुती कमीच आहे.
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सोहळ्यात अध्यक्षांनी "राजा तू चुकत आहेस" असं म्हणत सरकारचे कान धरले. तो अधिकार साहित्यिकाला असावा. साहित्यिक हा आईच्या भूमिकेत असतो. उत्तमोत्तम साहित्य निर्माण करताना समाज एकसंध कसा राहिल यावर साहित्यिक चिंतन करीत असतो. म्हणून तर ज्ञानेश्वरांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याऐवजी विश्वाच्या ईश्वराकडे लोककल्याणाचे पसायदान मागितले. आपण ज्ञानोबांना माऊली म्हणतो. तसा प्रत्येक साहित्यिक हा समाजाच्या हिताचा विचार करत असतो असे मला वाटते. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी राजाचे कान धरले यात चूकीचं काही केलं नाही. परंतु याआधी राजा चुकलाच नाही असे म्हणता येणार नाही. त्यावेळी मात्र साहित्यिक आईच्या भूमिकेत का नव्हते? तेव्हा त्यांना असा प्रश्न का विचारावासा वाटला नाही. ७० वर्षे राजा चुकत नव्हता आणि एकाएकी राजा चुकतोस, असे कसे म्हणता येईल? असो. इथे या प्रसंगाचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे त्रिपुरात विजय मिळवळ्यानंतर दोन महत्वाच्या घटना घडल्या. त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील आघाडीचे विप्लव कुमार देब यांनी मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. माणिक सरकार ६९ वर्षांचे आहेत आणि देब ४८ वर्षांचे आहेत. माणिक सरकार वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आहेत. या न्यायाने देब यांची कृती हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. सावरकर म्हणायचे की राजकारणात कुणी शत्रू नसतो तर प्रतिस्पर्धी असतो. पण कॉंग्रेसने मात्र सावरकरांना नेहमी शत्रू म्हणूनच पाहिले आहे. आजही शत्रू म्हणूनच पाहत आहेत. असो.
राजकारणात देब यांच्या सारखे सावरकरी नितीचे आदर्श प्रतिस्पर्धी असायला हवेत. ही लोकशाहीची शक्ती आहे. दुसरी घटना म्हणजे दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये व्लादिमीर लेनिनचा पुतळा होता. हा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडला. यावेळी भारत माता की जय अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या. तिथे काही हिंसक घटना घडत असल्याचे वृत्तही वाचायला मिळत आहे.
त्रिपुरा निवडणूकीच्या आधी पत्रकार लेखक दिनेश कानजी यांनी "त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार" या नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक "Manik Sarkar; Real and the Virtual. The Gory Face of Anarchy" या नावाने इंग्रजीत सुद्धा उपलब्ध आहे. या पुस्तकात संदर्भ आणि पुराव्यांसह डाव्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचाराचे पाढे वाचण्यात आले आहेत. पण तरीही कुणा मिडियाला याविषयी बोलावेसे वाटत नाही. इतके अत्याचार होत असताना कॉंग्रेसचे केंद्र सरकार आणि भारतीय मिडीया झोपा काढत होते. मिडियाला सत्य दाखवण्यापेक्षा आपल्या जे हवे तेवढेच दाखवण्याची सवय आहे. ही सवय आता मोडली पाहिजे. डाव्यांनी जे अत्याचार केलेत त्यासाठी त्यांना शासकीय पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही कॉंग्रेस आणि डाव्यांपेक्षा वेगळे आहात, नरेंद्र मोदींचं कुटुंब राजकारणात नाही, ते प्रथम राष्ट्राचा विचार करतात म्हणून कॉंग्रेसची सत्ता जनतेने उखडून पाडली आणि नरेंद्र मोदींना राजसिंहासनावर लोकांनीच बसवले आहे. मोदी हे राजसिंहासनावर विराजमान होण्याआधी लोकांच्या मनाच्या सिंहासनावर विराजमान झाले. म्हणजे एका अर्थाने नरेंद्र मोदी हे जनह्रदयसम्राट आहेत. ही बाब भाजपच्या सर्व नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. जो उन्माद डाव्यांनी आणि कॉंग्रेसने केला, तो उन्माद भाजपने करावयाचा नाही. कॉंग्रेसने सावरकरांचा द्वेष केला, त्यांचा अपमान केला. पण म्हणून भाजपने गांधींचा अपमान करावयाचा नाही. वैचारिक मतभेद असले तरी गांधीजी हे आपलेच आहेत हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे लेनिन जरी आपला नसला व तो डाव्यांचा आदर्श असला, तरी त्याचे पुतळे उभारले नयेच, पण उभारलेले पुतळे पाडू देखील नये. कारण भाजप हा हिंदू विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि मुर्तीभंजकता ही हिंदूंची संस्कृती नव्हे. ती अरबस्थानाची संस्कृती आहे. हिंदूंनी उपासनापद्धतीत विविधता जोपासली. त्यात मुर्तीपूजा हा एक अविभाज्य भाग झाला. पण तुम्ही नास्तिक असला तरी तुम्ही हिंदूच राहता, हे मोठेपण इतर कोणत्याही विचारात नाही. मुस्लिम होण्यासाठी तुमची अल्लाह आणि प्रेषितावर श्रद्धा असलीच पाहिजे. नाहीतर तुम्ही गैर-मुस्लिम किंवा काफीर ठरता. पण हिंदूत्वात तसे बंधन नाही. हेच आपले वेगळेपण आहे. आज सबंध जगात हिंदू संस्कृतीचे आकर्षण आहे. पाश्चात्य लोक हिंदू संस्कृतीकडे स्वेच्छेने वळत आहेत. त्यासाठी इस्लाम सारखा हिंसक मार्ग किंवा ख्रिस्त्यांसारखी देवाची पब्लिसिटी आपण कधीच केली नाही. आपण केवळ आपले तत्वज्ञान कृतीच्या आधारे लोकांना सांगितले आणि लोक हिंदू संस्कृतीकडे आकृष्ट झाले आहेत.
लेनिन हा कधीही भारताचा आदर्श होऊ शकत नाही. त्याचे पुतळे भारतात असण्याचे तसे कारणही नाही. मुळात कम्युनिज्म, इस्लाम, ख्रिस्ती या विचारधारा हारताच्या परस्परविरोधी आहेत. सबंध हिंदू तत्वज्ञान, बौद्ध आणि जैन किंवा भारतातील सर्व उपासना पद्धती, बंडखोर सांप्रदाय या सर्व पाश्चात्य व अरबी विचारप्रणालीपेक्षा खुप वेगळे आहेत. भारताच्या आध्यात्माचा पाया खुपच वेगळा आहे. तरी आज मुस्लिम आणि ख्रिस्त्यांची संख्या पुष्कळ आहे आणि हिंदूंच्या राज्यात ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत. असे मुस्लिम राष्ट्रात पाहायला मिळत नाही. दुसरी बाब अशी की लेनिन हा कुणी महात्मा वगैरे नव्हताच. तो एक हुकुमशहा होता. त्याने लोकांच्या हत्या केलेल्या आहेत. असा निर्दयी माणूस डाव्यांचा आदर्श आहे आणि त्याच अपुतळा भारतात उभारला जातो, हे निर्लज्जपणाचं लक्षण आहे. डावे हे कधीही राष्ट्रप्रेमी होऊ शकत नाही. कारण त्यांची निष्ठा कधीही राष्ट्राशी नव्हतीच. भारताचा पिंड खुप वेगळा असला तरी काही अतिहुशार लोक स्वतःला डावे म्हणवून घेतात आणि परकीय विचारधारेशी एकनिष्ठ होतात. ज्या देशात डावी विचारधारा निर्माण झाली. त्या देशाची त्यास पुरक अशी परिस्थिती होती. पण भारत आधीपासून वेगळा आहे. इथली संस्कृती उदात्त आहे. इथे डावी विचारसरणी रुळण्याचे कारण नव्हते. तरी ती रुळली, हे दुर्दैव समजून आता नवी पहाट होत आहे यात समाधान मानले पाहिजे. देशात आणि अनेक राज्यात राष्ट्रवादी विचारांचे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. काही विघ्नसंतोषी लोक सोडल्यास भारतीय तरुण नवनिर्माणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. म्हणूनच उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगला पाहिजे. मुळात लेनिनची मुर्ती तोडल्यावर लेनिनला महात्म्य प्राप्त होईल. त्यापेक्षा त्या मुर्तीकडे दुर्लक्ष करुन लोकांच्या मनामध्ये सकारात्मकता आणि विश्वासाची मूर्ती उभारायला हवी. तसेच आपण डाव्यांसारखे निर्दयी अत्याचारी नसून आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्ही सबका साथ घेऊन सबका विकास करणार आहोत असा संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना कृतीद्वारे देता येईल. गांधी हत्येनंतर गांधींना खर्या अर्थाने महात्म्य प्राप्त झालं असं मला वाटतं. शिवरायांचे गुरु दादोजी कोंडदेव आणि साहित्यिक गडकरींचा पुतळा काही समाजकंटकांनी तोडला. ही त्यांची संस्कृतीच आहे. असे कृत्य करुन लोकांच्या मनात स्थान निर्माण करता येत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उन्माद म्हणून किंवा राग व्यक्त करण्यासाठी सुद्धा असे कृत्य करु नये. डाव्यांकडून झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध शासकीय पद्धतीने घेण्यात यावा. गुन्हेगारांना पकडून शासन करणे हेच लोकशाहीला अपेक्षित आहे. आपण रानटी अरबी नाही आणि डाव्यांसारखे अत्याचारी सुद्धा नाही. आपण हिंदू आहोत. हिंदूंनी उन्माद करु नये. राग व्यक्त करायचा झाल्यास तो मतपेटीतून व्यक्त करावा. कारण हिंदू हे लोककल्याणासाठी झटतात. हिंदू विश्वाच्या ईश्वराकडे जगाच्या कल्याणाचे पसायदान मागतात. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ हे हिंदूंचे मुख्य, मूळ आणि सनातन तत्वज्ञान आहे.
लेखक- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
9967796254
No comments:
Post a Comment