भारतीय नौदलाचे
अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संबधी सध्या पाकिस्तान जे वर्तन करीत आहे त्यापासून
भारतातील सर्व लोकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाकिस्तान नावाचा देश पाकिस्तानी
प्रवृत्तीतून निर्माण झाला आहे. ही पाकिस्तानी प्रवृत्ती हिंदुद्वेषावर
आधारित आहे. ह्या पाकिस्तानी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन होईल तेव्हाच भारताला दोन घास सुखाने खाता येतील
आणि शांत झोप घेता येईल. हे उच्चाटन हिंदूंनी समयबद्ध कार्यक्रम निर्धाराने आचरणात आणून करायचे आहे. हिंदूंचा
निश्चय आणि निर्धार परिपूर्ण असेल तर भारतातील मुसलमानांचे त्यांना सहकार्य
मिळण्यास अडचण येणार नाही. पाकिस्तानी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आणि ती नाहीशी
करण्यासाठी आवश्यक व्यवहार कोणता ह्याचा विचार करू.
कुलभूषण जाधव ह्यांना हेरगिरीच्या आरोपावरून
पाकिस्तानने मार्च २०१६ मध्ये पकडून आणि त्यानंतर त्यांच्यावर सैनिकी अभियोग
चालवून त्यांना देहांताची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ह्या शिक्षेच्या
कार्यवाहीस स्थगिती दिली आहे. पकडल्यानंतरच्या काळात पाकिस्तानने भारताला
जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्क स्थापन करू दिलेला नाही. बरीच आरडाओरड
झाल्यावर परवा म्हणजे २५ डिसेंबरला जाधव ह्यांची आई अवंतिकाबाई आणि पत्नी चेतना
ह्यांना जाधव ह्यांना भेटण्याची संधी पाकिस्तानने दिली. ही भेट
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात झाली. ही भेट सभ्यता आणि माणुसकी ह्याचे निकष पळून
कशी व्हायला पाहिजे ह्याविषयी भारताने पाकिस्तानशी बोलणी केली होती. परंतु
पाकिस्तानने प्रत्यक्ष व्यवहार अत्यंत वेगळा आणि माणुसकीशून्य असा केला. कुलभूषण
ह्यांना भेटण्याआधी त्यांची आई आणि पत्नी ह्यांना कपाळावरचे कुंकू, हातातल्या
बांगड्या आणि गळ्यातले मंगळसूत्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काढायला लावले. भेटीच्या
ठिकाणी दोघांच्यामध्ये काचेची भिंत उभी करण्यात आली होती आणि बोलणे इंटरकॉमवर होत
होते. उभयतांना एकमेकांना स्पर्श तर करता येत नव्हताच पण मराठीत बोलण्यासही प्रतिबंध
करण्यात आला होता. एक जरी मराठी शब्द तोंडातून निघाला तर पुढचा शब्द उच्चारला जाण्याच्या आत
इंटरकॉम बंद करण्यात येत होता. विचारलेल्या प्रश्नांना पाकिस्तानी अधिकारी
सांगतील त्याप्रमाणे कुलभूषण ह्यांना उत्तरे द्यावी लागत होती . त्यांचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ झाला
आहे हे त्यांच्या एकंदर आविर्भावावरून लक्षात येत होते. ही भेट ४०
मिनिटे झाली. तेथून बाहेर पडल्यावर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दोघी
महिलांना जे आणि जसे प्रश्न विचारले त्यावरून त्यांचा अपमान करून त्यांच्या दु:खात
भर घालण्याचा त्यांचा हेतू होता हे उघड आहे.
पाकिस्तानी प्रवृत्तीने आणि पाकिस्तानने
आजपर्यंत एकही सभ्यतेचा व्यवहार भारताशी आणि हिंदूंशी केलेला नाही. हिंदूंना आणि
भारताला दु:ख देण्यात आणि अपमानित करण्यात पाकिस्तानला अमर्याद आनंद होतो हे
अनेकवार स्पष्ट झाले आहे. म्हणून भेटीची विनंती मुळातून करायला नको
होती. पाकिस्तानला केवळ पुरुषार्थाची आणि शिवाजीची भाषा कळते. तथापि आपल्या
दोन महिलांनी संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जातांना जे धीरोदात्त वर्तन
केले त्याकरिता त्यांच्यासमोर माथा झुकविला पाहिजे. अर्थातच आपल्या ह्या माताभगिनींनी कुंकू, बांगड्या आणि
मंगळसूत्र ह्यांचा कुलभूषणाला भेटण्याशी काही संबंध नसल्याने कोणत्याही परिस्थितीत
ह्या पवित्र वस्तूंना पाकिस्तानला हात लावू देणार नाही अशी भूमिका घेतली असती तर
तो विषय आंतरराष्ट्रीय चर्चेचा होऊन पाकिस्तानचा हिंदुद्वेष प्रकर्षाने जगासमोर
आला असता आणि कुलभूषण प्रश्नाची सोडवणूक समाधानकारकपणे होण्यास बहुधा साह्य झाले
असते. जे झाले ते झाले. ह्या दोन महिलांकडून अशा वर्तनाची अपेक्षा आपण करतो तेव्हा संपूर्ण हिंदू
समाजाचे वर्तन तेव्हढेच प्रेरक असले पाहिजे हे गृहीत धरलेले असते हे विसरता कामा
नये. भविष्यात असे प्रेरक वर्तन पाहायला मिळावे म्हणून पाकिस्तानी प्रवृत्ती आणि
त्यावरील उपाय ह्याचा विचार केला पाहिजे.
ह्या देशात पहिला मुसलमान निर्माण झाला
तेव्हा पाकिस्तान जन्माला आले, असे स्वतः: महंमद अली जिना म्हणाले आहेत. म्हणजे
पाकिस्तानी प्रवृत्ती प्राचीन आहे. ही प्रवृत्ती विधिनिषेधशून्य आहे कारण की ती
सहजपणे हिंदूंची कत्तल करते, स्त्रियांवर
बलात्कार करते, मूर्तिभंजन करते आणि लुटालूट करते. हिंदू समाज आणि संस्कृती नष्ट करणे आणि अखंड
हिंदुस्तानचे अखंड पाकिस्तान करणे हे पाकिस्तानी प्रवृत्तीचे एकमेव आणि प्रधान
उद्दिष्ट आहे. पृथ्वीराज चौहानांशी झालेला विश्वासघात, पाकिस्तानी प्रवृत्तीचा शरीरस्पर्श नको म्हणून राजपूत स्त्रियांनी केलेला जौहार , संभाजी महाराजांची हत्या करतांना औरंगजेबाने
त्यांचे कातडी सोलण्यापासूनचे केलेले पाशवी अत्याचार, सत्तेचाळीसच्या
फाळणीच्यावेळेस हिंदू स्त्रियांना भोगाव्या लागलेल्या यातना आणि काश्मिरी
पंडितांचे निर्वासित होणे ही वानगीदाखल दिलेली उदाहरणे बोलकी आहेत. गेल्या शंभर
वर्षात हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कल्पना एकतर्फी बदलण्यात आल्या आणि त्यामुळे
प्रतिकारहीन करण्यात आलेल्या हिंदूंकडे बघून कितीही अत्याचार केले तरी हिंदू ते
सहन करणार आहेत अशी पाकिस्तानी प्रवृत्तीची निश्चिती झाली आहे. पाकिस्तानी
प्रवृत्तीने हिंदूंना गृहीत धरू नये असे ठसवून मानसिक क्रांती करायची असेल तर दोन
आघाड्यांवर हिंदूंना ठोस कृती करावी लागेल. सरकारी पातळीवर करावयाची कृती म्हणजे
भारताच्या सैन्याने पाकव्याप्त काश्मीर मुक्त केला पाहिजे आणि तो भूप्रदेश भारताला
पुन्हा जोडला पाहिजे. सुयोग्य रणनीतीला अनुसरून मोदी सरकारने आणि निर्मला सीतारामन ह्यांच्या
सरंक्षण मंत्रालयाने करावयाची तेव्हा कृती करावी पण तशी कृती होणार आहे असा सुप्त
विश्वास सगळ्या भारताला लवकरात लवकर देणे अनिवार्य आहे.
लोकांच्या पातळीवरील कृती सोपी आहे. आज कुंकू लावणे
किंवा न लावणे हा फॅशनचा प्रकार झाला आहे. ते बदलले पाहिजे. आपल्या दोन
भगिनींना पाकिस्तानने कुंकू लावू दिले नाही, असलेले पुसायला लावले ह्याचा निषेध म्हणून
आणि त्याला समर्पक चोख प्रत्युत्तर म्हणून सर्व हिंदू स्त्रियांनी ह्यापुढे आपले
वयोमान
आणि आपल्या
सामाजिक चालीरीती लक्षात घेऊन पण कपाळावर लहानमोठे कुंकू हे लावलेच पाहिजे. भारतातील
मुसलमान स्त्रियांकडूनही तीच अपेक्षा आहे. कुलभूषणची माता आणि पत्नी त्यांना त्यांचीही
माता आणि भगिनी वाटली पाहिजे. त्यांचा अपमान तो त्यांना त्यांचा अपमान
वाटला पाहिजे. पाकिस्तानचा निषेध म्हणून मुसलमान स्त्रियांनी कुंकू लावणे ह्याने
इस्लामविरुद्ध कृती होत नाही. उलट भारतातील बहुसंख्य स्त्रियांच्या सुखदु:खाशी
आम्ही समरस आहोत हे पाकिस्तानला दाखविण्याची मोठी संधी त्यांच्यापुढे चालून आली
आहे आणि त्यांनी तसे वर्तन केले तर ती इस्लामची सेवा होणार आहे. कारण
मुसलमानांना पाकिस्तानात मिळत नसेल एव्हढे धार्मिक स्वातंत्र्य भारतात मिळत आहे. त्याविषयी
कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे.
मुसलमान स्त्रियांनी हिंदू स्त्रियांच्या
बरोबरीने कपाळावर कुंकू लावणे हे ऐक्याच्या दिशेने उचललेले आश्वासक पाऊल ठरणार आहे.
त्याकरिता हिंदू स्त्रियांनीही मुसलमान स्त्रियांशी जवळीक निर्माण करण्याचा
प्रफुल्लित कार्यक्रम आचरणात आणला पाहिजे. प्रबोधन आणि सेवा ह्या दोन माध्यमातून हा
कार्यक्रम राबविता येईल. हिंदू स्त्रियांच्या सामाजिक संस्थांनी मुसलमान स्त्रियांना आपल्यात सामावून
घेतले पाहिजे. हिंदू स्त्रियांनी आपल्या परिसरातील मुसलमान स्त्रियांशी या निमित्ताने
संपर्क स्थापित केला पाहिजे. उदात्त विचारांचा परिचय त्यांना करून दिला पाहिजे. कुटुंब
नियोजनाचे महत्व पटविले पाहिजे. हिंदू स्त्रियांच्या सहवासात आल्याने
आपल्याला रोजगार मिळतो,
स्वातंत्र्य
मिळते आणि आपल्या जगण्याच्या आनंदात पूर्वीपेक्षा अधिक भर पडते असे मुसलमान
स्त्रियांना वाटले पाहिजे. असे कार्यक्रम जेव्हढ्या उत्कटपणे राबविले जातील तेव्हढे मुसलमान स्त्रियांना
पाकिस्तानचा निषेध म्हणून आपणही ठसठशीत कुंकू लावावे असे वाटू लागेल.
पाकिस्तानने आपल्या राज्यात मायलेकरांना आणि
पतिपत्नीला मराठीत बोलण्यास विरोध केला ह्याचा निषेध म्हणून भारत सरकारने वर्षातला
एक दिवस 'मराठी दिवस' म्हणून देशभर साजरा केला पाहिजे आणि लोकांनी त्यात उत्साहाने सामील झाले
पाहिजे. मराठी ही शिवाजीची भाषा आहे म्हणून ती सगळ्या भारतीयांची भाषा आहे. शिवाजी
महाराजांनी राज्याभिषेक होताच भाषाशुद्धीचे धोरण राबवून मराठीला प्रतिष्ठा मिळवून
दिली. तोपर्यंत राज्यकारभाराच्या भाषेत ८५ प्रतिशत शब्द फारसी होते आणि १५ प्रतिशत
शब्द मराठी. शिवाजी महाराजांनी प्रयतपूर्वक हे प्रमाण समसमान केले. शाहू महाराजांच्या काळात ८५
प्रतिशत शब्द मराठी झाले आणि १५ प्रतिशत शब्द फारसी राहिले. इतिहासकार राजवाड्यांच्या
खंडात ही माहिती आहे. महाराज होते म्हणून अन्य भारतीय भाषा जिवंत राहिल्या. मराठ्यांचे
घोडे जेथपर्यंत जाऊ शकले तोच भाग भारतात राहिला असे इतिहासकार शेजवलकर म्हणाले
आहेत. सर्व भारतीयांनी मराठीला मानवंदना दिली तर ते पाकिस्तानला सणसणीत उत्तर ठरेल
आणि महाराजांचे प्रति उचित अशी आदरांजली ठरेल.
ह्या निमित्ताने आणखी दोन गोष्टी करता येतील. पाकिस्तानशी
लढताना आपले जे जवान
धारातीर्थ पडतात
त्यांना 'शहीद' म्हणणे आपण लगेच थांबविले पाहिजे. इस्लामच्या ध्येयपूर्तीसाठी जो प्राणार्पण
करतो त्याला शहीद
म्हणतात. शहीदवरून शहादत
शब्द झाला. आपले जवान इस्लामचे राज्य भारतात यावे म्हणून आपल्या प्राणांची कुरवंडी करीत
नाहीत. भारताची स्वतंत्रता, सार्वभौमत्व, अखंडता आणि
एकात्मता ह्यावर पाकिस्तानी प्रवृत्तीची सावली पडू नये म्हणून ते केव्हाही आपले
प्राण फुंकून टाकायला सिद्ध होतात. त्यांना 'हुतात्मा'
म्हणून गौरविले
पाहिजे. शहीद म्हणून त्यांचे हौतात्म्य कलंकित करता कामा नये. त्याचप्रमाणे
मोहम्मद इकबालचे
'सारे जहाँसे
अच्छा'
हे गाणे म्हणणे
थांबविले पाहिजे. कारण हे गाणे लिहून इकबाल पाकिस्तानात गेला. त्याने हिंदूंकडे आणि हिंदुस्थानाकडे
ढुंकूनही बघितले नाही. हिंदुस्थान सगळ्यांपेक्षा चांगला आहे हे समजण्यासाठी पाकिस्तानी प्रवृत्तीच्या
इकबालची आवश्यकता नाही. प्रश्न कुंकवाचा आणि मराठीच्या अभिमानाचा आहे. प्रश्न भारतमातेच्या सार्वभौमत्वाचा आहे. सर्वांनी
विशुद्ध देशभक्तीचा साक्षात्कार घडविला पाहिजे. शहाजहान बादशहाने वडाचे झाड कापून त्याच्या
बुंध्यावर कढई ठोकली होती आणि हिंदूंचा वंश खुंटल्याचे सूचित केले होते. पुण्यातून
गाढवाचा नांगर फिरविला होता. महाराजांनी सोन्याच्या नांगराने त्याच भूमीचे पुनःपुन्हा अभिसरण केले आणि
हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखविले. तेच अभिसरण एक कुंकू लावून आपल्याला पुन्हा
सुरु करायचे आहे.
-जेष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी
No comments:
Post a Comment