(श्री क्षेत्र सज्जनगड वर स्थित समर्थ श्री रामदास स्वामी समाधी ) |
न पवसि मजसि का रे, म्या तुझें काय केले?
किती सुंदर कल्पना आहे हो ही ! स्वामी-भृत्य संबंधांचें अतिशय प्रेमळ उदाहरण ! डोळ्यांतून पाणी आणणारे, भावूक करणारे.
बारा वर्षांची घनघोर तपश्चर्या, पुरश्चरण ! त्यानंतर बारा वर्षे तीर्थाटन ! प्रभु रामचन्द्रांचा हा परमभक्त, "मी कुणी नाहीच; फक्त रामाचा दास, रामदास" असे अभिमानानें मिरणवणारा हा समर्थ सद्गुरू, जीवनभराच्या या दगदगीनें दमून गेला, थकला होता. आता तर त्याच्या लाडक्या व "कित्येक दुष्ट संहारणार्या" प्रिय शिष्यानें गुरूमाऊलीच्या नित्य निवासाकरिता सज्जनदुर्ग दिला होता, कशाची म्हणून कमी नाही, पण तो तर विरक्तच ना ! त्यास काय करायच्या या सुखलोलूपतेच्या गरजा ?
असो..! वय झाले होते आता. युवावस्थेत सुप्तरूपात असणार्या कफानें आता चांगलेच डोके वर काढले. त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. तो थांबावा म्हणून नाना उपाय झाले, विडा खाण्याचा सल्ला वैद्यांनी दिला. ते बिचारे लेकरू कल्याण; रोज उर्वशीचे पाणी कावडीनें आणत असे, माऊलीस वाहते जल हवे म्हणून ! पण कफाची वेथा कमी होइना.
एके दिवशी कहरच झाला, दुखणे पराकोटीस गेले, त्रास वाढू लागला. आता औषधानेही आराम पडेना, काय करायचे, शिष्य मंडळी चिंतातूर झाली. आका-वेणांच्या तर डोळ्यांतील पाणी खळेना.
आणि एकदम काय झाले कोण जाणें, समर्थ स्वामी उठले, व तडक चालत गडावरीसल धाब्याच्या महारूद्र हनुमंतरायांच्या मंदिरात आलेे. एकटक मारूतीरायाकडे पाहू लागले. युवावस्थेतील नमस्कारांनी पिळदार बनवलेला तो देह, ती जबर शरिरयष्टी खंगू लागली होती, आणि ते तेजस्वी पाणीदार डोळे महारूद्राशी संवाद साधत होते.
" आंजनेया, कपिवर्या, महारूद्रा, का रे असा अंत पाहतोस ? कफास उतार नाही पडत, हा काय हौशीने लावून घेतलाय् का मी ? गुरूमाऊली प्रभु रामचन्द्र व तुझेंच कार्य केले ना ? धर्मकार्यच केले ना ? देशजागृती करून शिवबास हातभार लावला ना, त्या दगदगीनेच हे दुखणे जडले रे ! मला माझी काळजी नाही वाटत, पण माझी बाळं बघ, कल्याण एवढेसे तोंड करून बसलाय, आका-वेणा रडताहेत मला त्यांचेकडे पाहवत नाही रे ! सर्व औषधे सुरूयेत, पण उतार नाही ! हे रामहृदयधना, शिवशंभोच्या रूद्रा, हा कफ उतरव रे !.."
अशी प्रार्थना केली व नकळत एक करूणाष्टक स्फुरू लागले, समर्थ गुरूमहाराज ते करूणेनें गाऊ लागले.
फणीवर उठविला, वेग अद्भूत केला।
त्रिभुवनजलोकी किर्तीचा घोष गेला।।
रघुपति उपकारें दाटले सर्व भारे।
परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे।।
"लक्ष्मणास उठविणार्या, मनोजवं वेगवान् मारूतीराया, माझ्या कफास उतार पाड रे, तुझ्यावीना मला कोण आहे? तुला ठावूक आहे ना, प्रभु रामचन्द्रांनी माझी काळजी घ्यावयास तुला नियुक्त केले आहे ! मला तुला निरविले आहे हे आठवतेय् ना, मग माझ्याकडे का लक्ष देत नाहीस रे??"
तुजवीण मज पाहे, पाहता कोण आहे।
म्हणवूनीं मन माझें रे तुझी वास पाहे।।
मज तुज निरविले, पाहीजे आठविले।
सकळीक नीजदासांलागी सांभाळविले।।
एवढी प्रार्थना केली, पण मारूतीरायांस आपल्या या ब्रह्मचर्य शिरोमणी अंशाची अजून गंमत करावीशी वाटत असावी, एवढे झाले तरी उतार पडेना !
आता समर्थ जरासे रागावले, अर्थात् पुत्र पित्यावर जसा लटका रागावतो तसा. काहीसे रागातच समर्थ म्हणाले,
"कपिंद्रा, करूणेचा मेघ तुझ्या अंतरीं वास करतो ना ! मग तुला माझी कणव का रे येत नाही? का चित्त पाषाणवत् कठोर केलेस रे? मला, या तुझ्या भक्ताला पावत नाहीस, मी तुझे काय केले आहे रे? (मी तुझे काय घोडे मारले आहे?)
जलधर करूणेचा अंतरामाजी राहे।
तरीं तुज करूणा रे का न ये सांग पाहे।।
कठीण हृदय जाले, काय कारूण्य गेले।
न पवसि मजसि का रें, म्या तुझें काय केले??।।
आता मात्र मारूतीराय गहीवरले, दाटून आले त्यांना ! नको माझ्या बाळाची ही अवस्था, नको त्यास ही दगदग! किती काकूळतीस आला आहे ! मनोमन मारूतीराय हसले, आणि-आणि-आणि-
पुढल्याच क्षणी घसा स्वच्छ झाला की मंडळी ! कफ कुठल्या कुठे पळून गेला ! एकदम पुर्वीसारखी निरोगी न तेजस्वी देहयष्टी बनली! अगदी निरोगी! सगळ्यांना आनंदीआनंद झाला! उध्दव कल्याण आका वेणा आनंदाश्रू ढाळू लागले ! समर्थ त्याच पूर्वीच्या भारदस्त आवाजात गरजले-
महारूद्र हनुमान की जय ||
जय जय रघुवीर समर्थ ||
मग मनांतच हितगुज सुरू झाले महारूद्रांशी. "मारूतीराया, अखेर करूणा आलीच ना तुज माझी??
बहुतचीं करूणा या लोटली देवराया।
सहजची कफ गेला, जाहली वज्रकाया।।
परम सुख विळासे, तेवीं दासानुदासे।
पवनतनुज तोषें वंदिला रामदासे।।
धन्य ते मारूतीराय, धन्य ते रामराय धन्य ते कल्याणादि शिष्यगण, धन्य तो सज्जनगड आणि धन्य ती तुमची माझी परात्पर सद्गुरूमाऊली, धन्य ती ब्रह्मचर्य व भक्तीभावाची अनवरत गंगा!!
|| जय जय रघुवीर समर्थ ||
लेखक - सुधांशू सुधीर कविमंडन
No comments:
Post a Comment